कळवा, विटावा, खारेगाववासियांना नववर्षात पाईपद्वारे गॅसचा पुरवठा

खासदार शिंदे यांनी घेतली महानगर गॅस कंपनी अधिका- यांची बैठक

ठाणे – शास्त्रीनगर, मनिषानगर येथे पहिल्या टप्प्यात पाईप गॅसद्वारे पुरवठा सुरू करण्यात आला असून, कळवा-खारेगाव-विटावावासीयांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. मार्च २०१८ पासून येथील रहिवाशांना पाईपद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा सुरू होणार आहे या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महानगर गॅस कंपनीच्या अधिका- यांची बैठक घेऊन त्यातील अडचणी सोडवल्या.

या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी  महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रकल्पासमोरील अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. डोंबिवलीमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या होत्या पण त्या अडचणी दूर होऊन तो प्रकल्प मार्गी लागला. डोंबिवलीत अनेक भागामध्ये पाईपद्वारे गॅस मिळत असून सीएनजी पेट्रोलपंपही सुरू झाल्यामुळे रिक्षा आणि वाहनधारकांना दूर अंतरावर जाऊन सीएनजी भरण्याचा त्रास वाचला आहे. कळव्यात देखील ज्या काही अडचणी येतील, त्या सोडवण्याची ग्वाही खा. डॉ. शिंदे यांनी देत कुठल्याही परिस्थितीत वेळापत्रकानुसारच काम पूर्ण झाले पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार सदर कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे अश्वासन महानगर गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक मूर्ती यांनी दिले. सदर बैठकीत खा. डॉ. शिंदे यांच्यासह कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मंदार केणी, महानगर गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक मूर्ती, मुख्य व्यवस्थापक संतोष सामंत, वरिष्ठ व्यवस्थापक (ठाणे) श्री. सचिन परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *