पुणे : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतून महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आज अर्ज माघार घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं आहे.
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेड व राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जांमुळे महाविकास आघाडीसमोर मोठी अडचण झाली होती. परंतु अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी शुक्रवारी चर्चा केली. त्यानंतर सचिन अहिर यांनी या उमेदवारांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशीही चर्चा केली. या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून देण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. खासदार संजय राऊत तसेच विनायक राऊत यांनीही त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.