मुंबई (अविनाश उबाळे) : अरे सागरा ….. भीम माझा येथे निजला…..शांत हो जरा…अरे सागरा…. दादर चैत्यभूमीवर बुधवारी निळ्या सागराच्या लाटा किनारी शांत झाल्या बाबासाहेबांच्या लेकरांचा आधारवड हरपला तो दिवस ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी लाखोंच्या संख्येने भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून अबालवृद्ध,पुरुष स्त्रिया पांढरे शुभ्र कपडे परिधान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर कुच करतात.
भीम अनुयायांचे तांडे चैत्यभूमीवर झेपावतात बुधवारी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरांतून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी अक्षरशः भीम सागर उसळला होता.
सोमवार रात्रीपासूनच मुंबईसह राज्यातील खेड्यांपाड्यांतून, देशभरातून आंबेडकरी आनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाला होता. शिवाजी पार्क ते चैत्यभूमी हा परिसर लाखोंच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. निळे झेंडे,निळी टोपी, पांढरेशुभ्र वेश परिधान केलेल्या पुरुष महिला लहान मुले अबाल वृद्ध यांच्या जथ्थेच्या जथ्थे चैत्यभूमीकडे एका रांगेत शिस्तीने जाताना दिसून आले. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या ओढीने चैत्यभूमीच्या दिशेने जात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भिम बोलो, दादर चैत्यभूमी चलो या घोषणांनी दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमी परीसर मंगळवारी दणाणून गेला होता.
शिवाजी पार्क परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली हेाती.
चैत्यभूमीवर पुस्तकांचे मोठया प्रमाणात स्टॉल्स लागलेले असतात. यंदा ३०० ते ३५० च्या आसपास स्टॉल्स लागले होते. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, ग्रंथ खरेदी करण्यासाठी तसेच बाबासाहेब, गौतम बुद्ध, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे तैलचित्र घेण्यासाठी आंबेडकरी आनुयायांची गर्दी दिसून आली.
मुंबई महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्याकडून मोफत भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली हेाती. काही ठिकाणी चहा, बिस्कीट, पोहे, शिरा या खाद्यपदार्थांचेही वाटप करण्यात आले. आंबेडकरी गाणे चैत्यभूमीच्या परिसरात तरुणांच्या गटाने जलसा आणि आंबेडकरी गीते गायली. शिवाजी पार्कवरील गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य मूर्ती प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होत्या. त्यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक जण आपल्या मोबाइलमध्ये ही सुंदर छबी टिपत होता. तरुणाईने सेल्फीचा आनंद लुटला.