आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना
दहा हजार पेन्शन मिळणार

मुंबई : आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रतिमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.  उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!