डोंबिवली : ठाकुर्ली जवळच्या ठाकुरवाडी भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय दुचाकीस्वाराचा प्रताप पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून उघडकीस आला आहे. हा तरूण दुचाकीवरून ठाकुर्लीतून जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका पादचाऱ्याला जोराची ठोकर देऊन गंभीर जखमी केले.
डोंबिवलीत राहणारे सतीश शिंदे आणि अविनाश कदम हे दोघे मंगळवारी दुपारी ठाकुर्लीतून पायी चालले होते. रस्ता ओलांडत असताना अल्पवयीन तरूण अचानक या दोन्ही पादचाऱ्यांच्या समोर दुचाकीवरून आला. त्याला दुचाकी नियंत्रित झाली नाही. त्याने अविनाश कदम यांना दुचाकीची जोरदार ठोकर दिली. ते जोराने रस्त्यावर पडले. त्यांच्या हाता पायाला गंभीर दुखापत झाली. अल्पवयीन दुचाकीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याने सतीश शिंदे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पालकांवर कारवाईची मागणी
18 वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीने वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असतानाही या 17 वर्षीय तरूणाने दुचाकी चालवून अपघात केला. ढील सोडले तर तो निर्ढावून आणखी अपघात करू शकतो. त्यामुळे त्याच्या हाती वाहन देणाऱ्या बेजबाबदार पालकांवर मोटार वाहन कायद्याने दंड आकारण्याची कार्यवाही वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी करण्याची मागणी पादचाऱ्यांनी केली.
उडाणटप्पू दुचाकीस्वारांसाठी समुपदेशन
कल्याण-डोंबिवलीमध्ये अनेक अल्पवयीन तरूण व तरूणी त्यांची वाहने सुसाट वेगाने चालवत असल्याचे चित्र दिसते. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस गस्तीवर असले की हे उडाणटप्पू दुचाकीस्वार अन्य मार्गाने पळ काढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा उडाणटप्पू दुचाकीस्वारांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे समुपदेशन करण्यात यावे. जेणेकरून भविष्यात स्वतः आणि इतरांच्या जीविताची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशीही अपेक्षा जाणकार व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येत आहे.