मुंबई – राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. दोन गटात विभागणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार असं दोघेही पक्षावर दावा ठोकत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पवार विरूध्द पवार असा सामना रंगला असून, पक्ष आणि चिन्हावरून महाभारत रंगल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉवरफुल्ल कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेचे बंड शिंदेंची स्क्रिप्ट आणि राष्ट्रवादीचे बंड पवार गटाची स्क्रिप्ट सर्वकाही सेम टूम सेमचा प्रत्यय दिसून येत आहे.

अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावेळी त्यांनी शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले.

सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.”हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरजेचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो.आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का?” असं अजित पवार यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेता निवडण्याचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. अपात्रतेची नोटीस देणं हे बेकायदेशीर आहे. आता महायुतीचं सरकार असून ते चांगलं काम करेल. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी, अमोल मिटकरी हे उपस्थित होते.

शरद पवारांना अध्यक्ष मानता तर पटेल, तटकरेंवरील कारवाई मान्य आहे का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

अजित पवार गटानं पत्रकार परिषद घेत महत्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली होती. पण या नियुक्त्यांना कायदेशीर संविधानिक मान्यता नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. हा दावा करताना आव्हाडांनी संविधानानुसार निवडणूक आयोगानं घालून दिलेले राजकीय पक्षाचे नियम काय आहेत, ते वाचूनच दाखवले. अजित पवार गटाला विलिन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. पक्षाला नुकसान करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार पार्टी अध्यक्षाला आहे. यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्यात आले आहेत. तुम्हाला कायदेशीर मान्यता नाही असे आव्हाड म्हणाले.

आमचे नेते शरद पवार आहेत, असे तिथे सर्वच म्हणत होते. आता नैतिकतेचा प्रश्न उभा राहतो. जर तुम्ही शरद पवारांना अध्यक्ष मानता तर त्यांनी केलेली कारवाई मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकजण म्हणत होते असा उल्लेख त्यांनी केला. ते एकजण म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी केलेल्या कोणत्याही नियुक्तीला मान्यता नाही. ‘त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, की त्यांनी शरद पवारांकडे यावं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगावं.’, असे आव्हाड म्हणाले. तोंडाला काळ फासा किंवा काहीही करा, रक्तात फक्त शरद पवार आहेत. तत्वांपासून आम्ही लांब राहणार नाहीत आणि शरद पवारांना सोडणार नाहीत,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!