१३ वर्षानंतर अखेर न्यायालयीन लढाईला यश

मुंबई, दि.१६ ऑक्टोबर :- पुण्यातील भिडेवाड्या संदर्भातील स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका व राज्यसरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच या स्मारकाचे काम सुरु केले जाईल. पुण्यातील भिडे वाड्या संदर्भातील तेथील स्थानिक पोट दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आज नाशिक येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या वाड्याबाबत स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने देखील विधीज्ञांची नेमणूक करून आपली बाजू सातत्याने मांडण्यात येत होती.

छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने पोट भाडेकरू यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर या विषयाला गती मिळून पुणे महानगरपालिकेने सुद्धा याबाबत बैठका घेतल्या. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन भुजबळ हे उच्च न्यायालयातील तारखांना स्वतः उपस्थित राहत होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबतीने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र,काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु होता. सन २०१० मध्ये याठिकाणी स्मारक करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला. त्यानंतर येथील पोट भाडेकरूंनी उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती जी.एस. पटेल व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने आज याबाबत निर्णय दिला. यासाठी राज्यशासनाच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्याला यश आले आहे. आता पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी अनेकदा आंदोलने केली होती. याठिकाणी स्मारक उभारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतल्यानंतर याविरोधात वाड्यातील पोटभाडेकरुंकडून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सदर जागेवर दावा करतानाच या ठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याबद्दल भाडेकरुनी याचिका केली होती. याठिकाणी सावित्रीबाई फुले यांची शाळा असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा.हरी नरके यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा असल्याबाबत पुरावे गोळा केले होते. तसेच यासाठी कोल्हापूर विद्यापीठातील प्रा.मंजुश्री पवार यांची सुद्धा यासाठी मदत घेतली होती.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जल्लोष


भिडे वाड्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मंत्री छगन भुजबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फटाके फोडत, पदाधिकारी कार्यकर्ता पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्षा कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर एंडाईत, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, किशोरी खैरनार, अमोल नाईक, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र शिंदे, संदीप गांगुर्डे, अमर वझरे, नाना पवार, भारत जाधव, प्रकाश माळी, अमोल कमोद, उपेश कानडे, प्रा.मोहन माळी, निशा झनके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!