विकास कामांचे नियोजन दीर्घकाळाचा विचार करून व्हावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे : नवीन पुत्री पुलाच्या कामासाठी रेल्वेसह संबंधित सर्वच यंत्रणानी गतिशीलता दाखवत या पुलाचे काम मार्गी लावले. त्याचप्रमाणे सर्वच विकास कामांचे नियोजन पुढचे पन्नास ते शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून व्हायला हवे. आपल्याला विकास हा शाश्वत करायचा आहे त्यासाठी सरकारही कटिबद्ध असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पत्रीपुल उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पध्दतीने संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम(सा.उ) तथा पालकमंत्री  एकनाथ शिंदे,पर्यावरण व पर्यटनमंत्री  आदित्य ठाकरे, कल्याण डोंबिवली महानगर पालिका महापौर विनिता राणे, खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, प्रमोद पाटील, गणपत  गायकवाड, बाळाजी किणीकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सुर्यवशी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तसेच  या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम  पुर्ण होऊन  पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने वाहतुककोंडी कमी होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. करोना नियंत्रित पण धोका टळलेला नाही.

प्रत्येक नागरिकाने जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण कोरोना नियंत्रणात आणला असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. लसीकरण सुरु झाले असले तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे.  मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही खबरदारी घ्या जबाबदारी आम्ही घेतलेली आहे असे आवाहनही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, हा पुल अतिशय महत्वाचा असून भिवंडी शिळ, नाशिक,अहमदाबाद तसेच जेएनपीटी कडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या दृष्टिने, महत्वाचा पुल आहे. अनेक तांत्रिक अडचणीवंर मात करुन आपण विहीत मुद्दतीत काम पुर्ण केले. हैद्राबाद येथे संपूर्ण गर्डर बनविण्याचे काम करण्यात आले.  सदर १०६ मीटर लांबीचा पुल आहे. रेल्वे विभागाने या कामासाठी पुरेसे सहकार्य केले. हा पुल लोकांसाठी  खुला होणार आहे. याचा आनंद आहे. ठाण्याचा कोपरी पुल देखिल येत्या मार्च महिन्यात नागरिकांसाठी खुला होणार आहे. कल्याण डोंबिवलीतील विकासकामे वेगाने सुरु आहेत.  रस्त्याची कामे झाल्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या कमी होईल असे  शिंदे म्हणाले. यावेळी  खा.कपिल पाटील व डॉ. श्रीकांत शिंदे यांची भाषणं झाली. यावेळी  प्रास्ताविक करताना राधेश्याम मोपलवार  म्हणाले की, १०४ वर्ष जुना पत्रीपुल पाडून नवीन पुल उभारण्याचे नोव्हेंबर २०१८ निश्चित केले. १०९ मी.लांबीचा पुल आहे. हे सर्व काम १ वर्ष २० दिवसात पुर्णत्वाकडे नेण्यात आले. पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने आजपासुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.citizenjournalist4.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *