काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं आज मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. निधनासमयी ते 72 वर्षाचे होते. 1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहीले.
पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ‘लोकनेता’ म्हणूनही त्यांचा गौरव झाला. जून 1991 ते मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री, मे 1992 ते 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते), ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री, नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री, डिसेंबर 2008 पासून – कॅबिनेट मंत्री, महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण, मार्च 2009 पासून – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते, नोव्हेंबर 2009 पासून पुढे – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन – वनविभाग, 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य – वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आदी खाती सांभाळली.
एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो : मुख्यमंत्री
माजी मंत्री श्री पतंगराव कदम यांच्या निधनाने आपण एका उमद्या आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पतंगरावांच्या निधनाने एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या गावांतून एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. तसेच शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 5 ते 6 कि.मीचा प्रवास करावा लागत असे. आपल्या बालपणीच्या या व्यथांची आठवण ठेवत त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण मिळावे, याची सोय केली. सहकार क्षेत्राची बांधणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते आणि ते सदैव स्मरणात राहील. नवनव्या प्रगत शैक्षणिक संकल्पना जाणून त्याचा आपल्या संस्थांमध्ये कृतीशील अवलंब करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. राज्य मंत्रिमंडळातही उद्योग, सहकार आदी महत्वाच्या विभागांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
त्यांचे कुटुंबीय, मित्र, आप्तस्वकिय यांच्या दु:खात मी सहभागी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा लिलावती रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
…….
*महाराष्ट्राचे दूरदर्शी व दिलदार नेतृत्व हरपले!: विखे पाटील*
मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे राज्यातील एक दूरदर्शी व दिलदार नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, नागपूर अधिवेशनात आम्ही एकत्र होते. त्यानंतर ते असे अचानक आजारी पडतील आणि जगाचा निरोप घेतील, अशी शंकाही कधी जाणवली नाही. आजारपणातून ते बरे होऊन परततील, अशी आशा आम्ही बाळगून होतो. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घालून राज्यातील एक उमद्या मनाचे नेतृत्व हिरावून घेतले.
आ.डॉ. पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात भरीव योगदान दिले. सहकार, शिक्षण, कृषी क्षेत्रासह राजकारण व समाजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका वठवली. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली. संघटनात्मत पातळीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्येही त्यांनी मागील अनेक वर्ष ते सक्रिय भूमिका बजावत आले.
डॉ. पतंगराव कदम राज्यातील लोकप्रिय व जाणकार नेते होते. अनेक वर्ष राज्यस्तरावर काम करतानाही त्यांनी जमिनीशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संबंध होता. आपल्या साध्या-सरळ स्वभावाने माणसे जिंकण्याची विलक्षण कला त्यांना लाभलेली होती. अत्यंत गंभीर प्रश्नांनाही सहजपणे हाताळण्याचा अंगीभूत गूण त्यांच्याकडे होता. अत्यंत हजरजबाबी व प्रसन्न व्यक्तीमत्वाचे ते धनी होते. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची निसर्गदत्त कला त्यांना प्राप्त होती, या शब्दांत विखे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विखे पाटील कुटुंबाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले. सरकार व विधानसभेत काम करताना मला देखील नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभत आले. त्यामुळे त्यांच्या निधनाने माझी मोठी व्यक्तीगत हानी झाल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.