डोंबिवलीत पासपोर्ट केंद्राचे केंद्रीय संचार राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : पासपोर्ट सेवा केंद्राचा 50 लाख लोकांना फायदा
डोंबिवली दि. १२ : डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीच्या टपाल कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राचे (पी.ओ.पी.एस.के.) उद्घाटन आज केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यामूळे गेल्या काही वर्षांपासून असणारी पासपोर्ट सेवा केंद्राची प्रतिक्षा आज अखेर संपुष्टात आली. या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर आसपासची शहरं आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीशचंद अग्रवाल आणि प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. राजेश गवांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चौहान म्हणाले की, सामान्य माणसाला सुध्दा पासपोर्टची गरज भासते. देशात ६ महिन्यात ६ लाख पासपोर्ट वितरित करण्यात आले आहेत. भारतीय डाक विभागाने देशातील जनतेची सेवा केली आहे. टपाल कार्यालयातून आता टपाल पोहोचवितानाच पासपोर्ट देखील देण्यात येणार आहे. देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून कशाप्रकारे काम करता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने घालून दिला आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत आपण सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासनही केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी यावेळी दिले.
खासदार श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की, या पासपोर्ट ऑफीसमुळे लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. पासपोर्ट काढण्यासाठी आता ठाणे येथे जाण्याची गरज भासणार नाही. पासपोर्ट मिळण्यासाठी पोलीसांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. ते त्वरित मिळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना दिल्या. तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीतील या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर जागेच्या अडचणी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे काम लांबणीवर पडले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा अधिवेशनादरम्यान आपण दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांनतर वेगाने चक्र फिरत 4 वर्षांपासून रखडलेल्या या महत्वाकांक्षी कामाचे अवघ्या काही महिन्यातच उद्घाटन झाले असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
पासपोर्ट सेवा केंद्राचा 50 लाख लोकांना फायदा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे..
पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ तब्बल 50 लाख नागरिकांना होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रामुळे लोकांना आता ठाण्याला जायची आवश्यकता भासणार नाही. डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रात नविन पासपोर्ट बनवण्यापासून ते पासपोर्ट नूतनीकरणापर्यंत सर्व सेवा मिळणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे ही पासपोर्ट सेवा प्रोजेक्ट (पीएसपी) चा भाग आहेत. हा प्रोजेक्ट भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून नॅशनल ई-गव्हर्नन्स प्लॅन चा एक भाग म्हणून पी.पी.पी. तत्वावर यशस्वीरीत्या राबविला जात आहे. डोंबिवली येथील पीओपीएसके हे प्रादेशिक पारपत्र कार्यालय मुंबई यांचे १३ वे केंद्र असून सदर केंद्र हे नागरिकांसाठी पासपोर्ट संबंधित सुधारित सेवा उपलब्ध करून देण्याच्या परराष्ट्रीय मंत्रालय आणि पोस्ट विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून देशात ४२८ कार्यालय सुरू करण्यात आले आहे.