डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच, आता डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रूग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी या रूग्णाचे नमुने घेण्यात आले होते. या रूग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सिद्ध झालं. आतापर्यंत १२ देशात ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे.