मुंबई : राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला हेाता. या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, काही जण सांगताय मी त्यांचा गुरू आहे, आज त्यांची बैठक झाली, त्यामध्ये सगळ्यांचे फोटो होते, त्यामध्ये सगळ्यात मोठा फोटो हा माझा होता. आज मुंबईमध्ये पोस्टर लावले, तिथे सुद्धा माझे फोटो लावले आहे. त्यांना माहिती आहे, आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल, ते आपण घेतलं पाहिजे, खणखण नाणं वाचेल ते आपण घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना माझा फोटो दाखवावा लागत आहे. एकीकडे पांडुरंग म्हणायचं, गुरू म्हणायचं, आणखी काय काय म्हणायचं आणि दुसरीकडे आमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणायचं असं नसतं, असे देखील पवार म्हणाले.

पवार म्हणाले, पक्षाचा ताबा घेणं लोकशाहीत अयोग्य आहे. पुलोद सरकार बनवलं होतं. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी फडणवीसांनी केली, शब्द पाळला नसल्याची आठवणही शरद पवारांनी यावेळी करून दिली.

शिवसेनेसोबत गेलो म्हणून प्रश्न उपस्थित केला गेला. तुम्ही शिवसेनेबरोबर गेले म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असे सांगितले जात आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे खरं आहे, त्यांनी ते लपवून ठेवलेलं नाही. पण शिवसेनेचं हिदुत्व हे सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व हे विषारी, विघातक, मनुवादी, माणसामाणसांत फूट पाडणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवार पुढे म्हणाले की, याआधी जे सोडून गेले ते पडले. त्यानंतर नवीन तरुण चेहरे आले. आज जे गेले त्यांना जाऊद्या, सुखाने राहू द्या. आपण एकत्र आहोत तोपर्यंत नवीन कर्तुत्व सहकारी टीम तयार करू. उष:काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिला मग आम्ही भाजपासोबत गेलो त्यात काय चुकलं ? अस त्यांचे म्हणणे आहे. मीच तेथील राष्ट्रवादीमधील नेतेमंडळींना भाजपाला पाठिंबा देण्यास परवानगी दिली हे खरं आहे. नागालँड किंवा मणिपूर सारखी राज्य ही भौगोलिकदृष्टया महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहेत. तो संबध भाग शेजारील देशांना चिकटून आहे. चीन आणि पाकिस्तान या देशांना चिकटून असलेली भारतातील जी राज्य आहेत त्यांच्यासंबधी बारकाईने विचार करून निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी या राज्यातील असंतोषाचा बाहेरील देश गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा राज्यांमध्ये राजकीय स्थैर्य असणे महत्वाचे असते म्हणून तेथे पाठिंबा देण्यात आला असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!