डोंबिवली : सालाबाद प्रमाणे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण-शिळ महामार्गावरील रिजन्सी अनंतम् च्या विस्तीर्ण पटांगणावर करण्यात आले होते. ऑलिम्पिकचे उद्घाटन रोटरी जिल्ह्याचे प्रांतपाल तथा प्रमुख पाहुणे मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते, पूर्व प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता प्रीती गाडे व सहाय्यक प्रांतपाल शैलेश गुप्ते यांच्या उपस्थितीत पार पडले. ऑलिम्पिकमध्ये कल्याण-डोंबिवलीतील तब्बल ३००० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचा प्रारंभ डोंबिवली रोटरी ऑलिम्पिकचे ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाला. डॉन बॉस्को शाळेच्या सुरेल अशा दोन बँड पथकाच्या तालावर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा दिमाखदार पदमार्च सादर केला. लजपत यांनी मार्चचे सूत्रसंचालन केले, तर बारवे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिकची शपथ दिली. दावडीतील छत्रपती शिवाजी मंडळाचे उस्ताद आणि विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, दांड-पट्टा, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांची चित्ताथरारक प्रात्यक्षिके सादर केली.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्टतर्फे गेल्या 32 वर्षांपासून करत असलेल्या डोंबिवली ऑलम्पिक उपक्रमाचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्याचा कालावधी कमी करून मैदानावर जास्त उपस्थिती लावावी, असेही आवाहन उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना त्यांनी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्टचे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी ऑलिम्पिकची पार्श्वभूमी आणि क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. विनायक आगटे यांनी केले.

ऑलम्पिकमध्ये डोंबिवलीतील जवळपास 70 शाळांनी सहभाग घेतला होता. खो खो, लंगडी, कबड्डी, ॲथलेटिक्स, लांब उडी, गोळा फेक, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील 3000 विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. डोंबिवलीकरांनी हजर राहून कार्यक्रमांचा आनंद घेतला. कबड्डी प्रो. निलेश शिंदे यांनीही हजेरी लावून या स्पर्धा संयोजनाबद्दल कौतुक केले. तसेच भविष्यातही रोटरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा चालू राहिल्या पाहिजेत, असे मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यात डोंबिवलीतील सहभागी शाळा, शिक्षक, परीक्षक विद्यार्थी, आणि डोंबिवलीकर क्रीडाप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यक्ष रघुनाथ लोटे, मानद सचिव डॉ. महेश पाटील, प्रकल्प प्रमुख रो. सतीश अटकेकर व प्रकल्प संचालक रो. कमलाकर सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी 2 दिवसाचे रोटरी ऑलिम्पिक यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे रोटेरिअन मानस पिंगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *