कागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर
महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत
मुंबई :- ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जाणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल ॲप व www.mahadiscom.in यावर ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध् करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.