संप मागे घ्या, बालकांना पोषण आहारापासून वंचित ठेवू नका : पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. मानधनवाढीसंदर्भात प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. संघटनांनी बालकांना वेठीस न धरता संप मागे घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनांना केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना व कर्मचारी कृती समितीसोबत मंत्री पंकजा मुंडे, सचिव विनिता सिंगल, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांनी चर्चा केली. मुंडे म्हणाल्या की, यापूर्वी आमच्या सरकारने अंगणवाडी सेविकांना 289 कोटींची तरतूद करून मानधनवाढ केली आहे. त्यानंतरही अधिक मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आला आहे. सरकार मानधनवाढीसंदर्भात सकारात्मक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक अंगणवाडी आहेत. शिवाय महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज दिली जाते, त्यांना 1 लाख रुपयांची विमा सुरक्षा देण्यात आली आहे. या सुविधा अन्य राज्यात नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले. पोषण आहाराचे लाभार्थी हे वंचित घटकातील आहेत. मानधनवाढीसाठी आदिवासी, कुपोषीत बालके, गर्भदा माता, स्तनदा माता यांना वेठीस धरणे योग्य नाही. बालकांना वेठीस न धरता तातडीने पोषण आहार सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!