ठाणे, दि. ९ – ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद व पाच पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण या आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थी आकाश सिंग याने चिठ्ठी काढून सोडत काढली.
ग्राम विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, ठाणे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण हे आरक्षण निश्चित करून देण्यात आहे आहे. तसेच जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या 1 पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित करून देण्यात आले. त्यानुसार संपूर्णतः अनूसूचित क्षेत्र असल्यामुळे शहापूर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच बिगर अनुसूचित क्षेत्रातील चार तालुक्यांसाठी आरक्षण निश्चित करून देण्यात आले आहे.
त्यानुसार, अनुसूचित क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एक पंचायत समिती सभापतीपद राखीव ठेवण्यात आले. त्यामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार हे आरक्षण यावेळी भिवंडी तालुका पंचायत समितीसाठी राखीव झाले आहे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार 2017 साली मुरबाड व सन 2019 रोजी अंबरनाथ पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेले होते. यावेळी उतरत्या क्रमानुसार हे आरक्षण भिवंडी पंचायत समिती सभापती पदासाठी लागू झाले आहे.
पंचायत समिती – सभापती पदाचे आरक्षण
1 शहापूर – अनुसूचित जमाती
2 भिवंडी – अनूसूचित जमाती
3 कल्याण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
4 मुरबाड – सर्वसाधारण महिला
5 अंबरनाथ -सर्वसाधारण