*भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाचे : पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन*
ठाणे दि ३०: रस्ता रुंदीकरणासाठी भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये अशी विनंती करतांनाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय तसेच वाहतूक  कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सुचना केली.

भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तथा पायाभरणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

प्रथम पलावा जंक्शन देसाई गाव येथे उड्डाणपुलाची पायाभरणी झाली ,तद्नंतर दुपारी ४ वाजता पत्रीपूल येथे रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाचा मुख्य समारंभ पार पडला. राज्य रस्ते विकास महामंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा मार्ग सुमारे २१ किमी इतका असून शिळफाटा ते रांजनोली जंक्शन असे काम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी बंदरे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, कल्याण डोंबिवली पालिकेचे नगरसेवक पदाधिकारी तसेच महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, आयुक्त गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यात प्रांत अधिकारी इतर विभागांचे अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे म्हणणे निश्चितपणे ऐकून घेतले जाईल मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये.

राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वी मोठमोठी आव्हाने स्वीकारली आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग , सागरी सेतू , ५५ उड्डाणपूल अशी कामे पार पाडली. आपण हाती सूत्रे घेतल्यापासून महामंडळाच्या कामाला अधिक गती दिली असून समृद्धी महामार्ग असो, ठाणे ते बोरीवली बोगद्याचे काम असो, रस्ते रुंदीकरणाची कामे असो किंवा कोस्टल रोड मधील बांद्रा- वर्सोवा टप्पा असो, या प्रकल्पांमध्ये चांगली प्रगती होत आहे. पत्री पूल तसेच पलावा  जंक्शन येथील उड्डाणपुलाची कामे ८ महिन्यात पूर्ण करावीत असेही पालकमंत्री यांनी या कामाचे कंत्राटदार असलेल्या अजय पाल कंपनीला सांगितले.

मेट्रो मार्ग खोणीमार्गे तळोजात गेल्यास शिळ तसेच डोंबिवली भागातील गावकरी यांना याचा फायदा होणार नाही त्यामुळे तो मार्ग शिळहून न्यावा यासाठी पाठपुरावा करणार असून भिवंडीतून कल्याण मध्ये येणारी मेट्रो देखील बिर्ला कोलेज मार्गे गेल्यास जास्तीत  जास्त लोकांना याचा फायदा होईल असेही पालकमंत्री म्हणाले. जलवाहतूक प्रकल्पासाठी १००० कोटी केंद्राने मंजूर केले असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे सातत्याने यासाठी पाठपुरावा करीत आहेत असे सांगून पालकमंत्री शिंदे यांनी ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेने देखील रस्ता रुंदीकरण, स्वच्छता  , धोकादायक इमारती यासारख्या विषयात अधिक गांभीर्याने लक्ष्य घालावे अशी सुचना केली.

*मुंबई- पुणे अंतर २५ मिनिटांनी कमी होणार*

मुंबई पुणे अंतर आणखी २ मिनिटांनी कमी करण्यासाठी द्रुतगती महामार्गावर  खालापूर ते सिंहगड कॉलेजपर्यंत बोगद्याचे नियोजन केले आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी बोलतांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले कि प्रकल्पांचे काम वेळेत झाले तर नागरिकाना या सोयी सुविधा लवकर वापरता येतील. मेट्रो चा मार्ग बदलण्याबात आपण निश्चित मुख्यमंत्र्यांशी बोलून पाठपुरावा करूत असेही ते म्हणाले. आमदार सुभाष भोईर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मोपलवार यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

शीळफाटा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या रस्त्यावरून नाशिक मार्गे आग्र्याकडे तसेच खाली गोवा-  कर्नाटकाकडे होणारी अवजड रस्ते वाहतूक आणि त्यामुळे होणारे वाहतुकीचे प्रश्न या रुंदीकरणामुळे सुटणार आहेत  नाशिक, गुजरात, पुणे शहरांकडे जाण्यासाठी शीळफाटा, भिवंडी वळण रस्ता हा मधला मार्ग असल्याने अवजड साहित्याचे वाहतूकदार शीळफाटा रस्त्याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.
*२१२ कोटी खर्च*

या मार्गाच्या रुंदीकरणासाठी २१२ कोटी खर्च असून १६ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आला असून  मे. राम क्रिपाल सिंग हे कंत्राटदार काम करणार आहेत. ३० महिन्यात हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
*असे होणार काम*

सहापदरी कामामध्ये पलावा जंक्शन येथे दोन पदरी उड्डाण पूल , दिवा –पनवेल रेल्वे मार्गावर कटई येथे रेल्वे उड्डाणपूल, पत्रीपूल येथे २ पदरी रेल्वे पूल, १४ मोठे जंक्शन्स,३१ बस स्थानके, २ पथकर स्थानके असे विविध स्वरूपाचे काम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!