डोंबिवली : विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे.तसेच आपल्या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीस वीज बचती बाबत जनजागृती करून वापर नसल्यास घरातील लाईट, फॅन, एसी बंद करण्याची सवय लावली पाहिजे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी आज केले. महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत १४ ते २१ डिसेंबर या दरम्यान साजरा केल्या जाणा-या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी विद्युत विभागाचे प्रशांत भागवत, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे ,शहर अभयंता अर्जुन अहिरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.



प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील यास प्रतिसाद दयावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत बनविण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृतीपर फलकांचे अनावरण आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे हस्ते करण्यात आले. यासमयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे इतर अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. विदयुत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे व वायरमन पंकज पुंड यांनी आपल्या मधुर आवाजात स्वरचित ऊर्जा संवर्धन गीताचे गायन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ याकालावधीत असलेल्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून या विषयाबाबत ठिकठिकाणी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती भागवत यांनी यावेळी दिली.


*****