ठाणे, दि. १५ : अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अडीचशेहुन अधिक विद्यार्थी, बाईकर व नागरिकांनी सहभाग नोंदविला तर यावेळी अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करण्यात आली.

३३ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज, पिक्सन फोटोग्राफी कंपनी, बोरिवली मेडिकल ब्रदरहुड असोसिएशन तसेच युवान ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, सेवानिवृत्त सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, रोटरी क्लबचे डीस्ट्रीक्ट् गवर्नर कैलास जेठानी, रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजचे अध्यक्ष अमित गवस, सेक्रेटरी रेणुका साळवी, लेखा अधिकारी अपर्णा पाटणे, पिक्सन फोटोग्राफी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित श्रीवास्तव, युवान ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील मराठे, डॉ. राजेश पांचाल, राजेश सोळंकी व जयश्री सोळंकी इ. उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण २५० व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये, प्रोफेशनल बायकर्स, बांदिवडेकर, जोशी बेडेकर, ज्ञानसाधना, ज्ञानगंगा या कॉलेजचे विद्यार्थी तसेच कर्मचारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
ही रॅली लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून सुरुवात होवून पोखरण रोड नंबर- २ मार्गे पलाई देवी मंदिर, उपवन ठाणे येथे सांगता झाली. समारोप कार्यक्रमात अवयवदानाबद्दल प्रतिज्ञा घेणाऱ्या ४० दात्यांची नोंदणी करून त्यांना युनिक रजिस्ट्रेशन नंबरचे डोनर कार्ड वाटप करण्यात आले. तसेच रॅलीमध्ये उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी होणाऱ्याना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. रस्त्यावरील अपघातात जखमी व्यक्तींना अवयव दानाची आवश्यकता असते. परंतु दुर्दैवाने अवयवदानाचे महत्त्व आपल्या समाजात नसल्यामुळे अनेकजण वंचित राहतात. या वंचितांना अवयव प्राप्त झाल्यास त्यांना पुन्हा नवजीवन मिळू शकते.

५० जीव वाचवू शकतो

एका व्यक्तीच्या अवयव दानाने आठ व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. तसेच आपण नेत्रदान व शरीरातील पेशींचे दान देखील करु शकतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ५० जीव वाचवू शकतो. जीवन मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर असणा-या आजारी व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी आपले अवयवदान हे जीवनदायी ठरु शकते, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *