शहापूर, दि. ७ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकादरम्यानच्या कळमगाव येथील अंडरपास पूल (आरयूबी) उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांना पत्राद्वारे ही माहिती दिली.

रेल्वेमार्गाखालील पुलावरुन कळमगाव, कानविंदे, खरम्याचापाडा, हेदूपाडा, अंबतपाडा, पेंढरी गावपाड्यातील शेकडो ग्रामस्थांचा प्रवास होतो. मात्र, या अरुंद मार्गामुळे केवळ छोटी वाहने पुलाखालून जाऊ शकतात. मोठ्या वाहनांना वळसा घालून जावे लागते. तर या भागातील बससेवाही एसटीने काही वर्षांपूर्वीच बंद केली होती. या ग्रामस्थांच्या हालाकडे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेच्या २०२१ मधील अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे लक्ष वेधले होते. त्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्र पाठवून कार्यवाही सुरू झाली असल्याचे कळविले आहे.

कळमगाव येथील अंडरपाससंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लि. यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्य करीत आहे. त्यानुसार आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकादरम्यानच्या कळमगाव येथे आरयुबी बांधण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. या कार्यवाहीमुळे कळमगाव येथील पुलाच्या कामासाठी वेग येण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *