मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरील खड्डयांवरून सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच आमने सामने आल्याचे आपण पाहिले आहे. दोन दिवसांपूर्वीच रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर पालिका अधिका-यांवर भडकल्याचा व्हिडीओ समोर आला. त्याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन खड्डे बुजविण्याच्या कामाला लागले आहेत. तसेच सर्व सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी आपापल्या प्रशासकीय विभागांमध्ये स्वतः फिरुन खड्डे भरण्याची कार्यवाही योग्यपणे होत असल्याची खातरजमा करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे आणि पावसाळी साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजना या संदर्भात महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह सर्व संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन : मुंबईतील ३१५० खड्डयांचे सचित्र दर्शन अधिका-यांना घडवले
मुंबई महानगरात एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत सर्व रस्त्यांवर मिळून ४० हजार पेक्षा जास्त खड्डे बुजविण्याची कामगिरी प्रशासनाने केली आहे. मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे ३ हजार मिलीमीटर पर्यंत पोहाचला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. टाळेबंदी शिथील केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
इतर कामांमधून तत्काळ कार्यमुक्त करा
तसेच रस्ते विभागातील अभियंत्यांना इतर कामे / जबाबदारी सोपविली असतील, तर त्यांना इतर कामांमधून तत्काळ कार्यमुक्त करुन पुढील १ महिनाभर फक्त रस्ते परिरक्षण विषयक जबाबदारीच प्राधान्याने देण्यात यावी. वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेल्या रस्त्यांवरील तसेच जास्त वर्दळींच्या रस्त्यांवरील खड्डे देखील प्राधान्याने भरावे आदी निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शक्यतो रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याची कार्यवाही करावी. म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही अशी सुचना करण्यात आलीय.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही महापौरांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केलीय