ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी राज्याची गाडी चालविण्याची गरज आहे. मातोश्री ते मंत्रालयापर्यंत ते गाडीने जात नाहीत. मात्र, ते आता पंढरपूरपर्यंत गाडी चालवित गेल्यामुळे अप्रूप वाटत आहे. राज्याचा गाडा विस्कळित झाला असून, मुख्यमंत्री हे राज्याचे ड्रायव्हर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याची गाडी चालवावी, असा टोला प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी बोलताना लगावला.
घोलाईनगर येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची दरेकर यांनी विचारपूस केली. या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा
मुंबई-ठाण्यातील चार घटना डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. शासकिय यंत्रणांना हाताशी धरून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली. त्यात गरीबीमुळे राहणाऱ्या नागरिकांवर आपत्ती कोसळली. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या काळात ही अनधिकृत बांधकामे झाली, त्यांच्यावर मोक्का नुसार कारवाई व्हावी. कोणत्याही छोट्या पदावरील अधिकाऱ्यांपेक्षा महापालिका आयुक्त वा तत्सम अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास अशी प्रवृत्ती ठेचता येईल, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांना शिवसेनेचे पाठबळ
मुंबई-ठाण्यात २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून एसआरए योजना लागू करण्यात आली. मात्र, शिवसेनेने विकासाला मुठमाती देत अनधिकृत बांधकामांना पाठबळ दिले. त्यामुळे त्याचा फटका बसत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
बेघरांना आठवड्यात घरांची मागणी
घोलाईनगर येथील दुर्घटनेनंतर बेघर झालेल्या कुटुंबांना महापालिकेने आठवडाभरात तात्पुरत्या स्वरुपात घर उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर लकी कंपाऊंडच्या धर्तीवर घोलाईनगर दुर्घटनेप्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदनाद्वारे केली.