नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर शेतक-यांनी या निर्णयाचे स्वागत करीत आनंद उत्सव साजरा केला तर विरोधकांकडून शेतक-यांपुढं मोदी झुकल्याची टीका करण्यात आली.
हुकूमशहा राज्यकर्त्यांचं गर्वहरण : सोनिया गांधी
शेतकऱ्यांचा हा विजय आहे. हुकूमशहा राज्यकर्त्यांचं गर्वहरण आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिय गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. गेल्या 12 महिन्यांपासून गांधीवादी आंदोलन सुरू होतं. आज 62 कोटी अन्नदाते, शेतकरी, शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 700 हून अधिक शेतकऱ्यांनी हे कायदे परत घेण्यासाठी बलिदान दिलं. त्यांच्या बलिदानाचं हे फलित आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे, असं त्या म्हणाल्या.
अहंकाराची मान झुकली : राहूल गांधी
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशाच्या अन्नदात्यांच्या सत्याग्रहासमोर अहंकाराची मान झुकली आहे. अन्यायाविरोधातील या विजयाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय हिंद किसान, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारला शहाणपणं आलं : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किंमत चुकवावी लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले, असं सांगतानाच उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : उध्दव ठाकरे
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.
शेतक-यांचे खूप नुकसान होणार : चंद्रकांत पाटील
शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.