मुंबई : केारोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे त्यामुळे अनेकांना नोक-याही गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय, अजूनही कोरोनाच्या विळख्यातून सुटका होऊ शकलेली नाही. मात्र कोरोनाच्या काळात आयटी क्षेत्रासाठी गुड न्यूज आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने नोकऱ्या शोधत असलेल्या लोकांसाठी चांगली बातमी दिली आहे. 2022 या आर्थिक वर्षात INFOSYS मध्ये फ्रेशर्सना संधी मिळणार असून, तब्बल 55,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा कंपनीने केलीय. त्यामुळे आयटी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी ठरलीय.
Moneycontrol ने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निलांजन रॉय यांनी सांगितले की, कंपनीचा टॅलेंट पूल वाढवणे आणि विकसित करणे हे आमचे प्राधान्य असेल. या लक्ष्यांतर्गत, आम्ही आमच्या ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत आर्थिक वर्ष 2022 मध्ये 55,000 हून अधिक भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कंपनीकडे डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 2,92,067 कर्मचारी होते, मागील तिमाहीत 2,79,617 आणि डिसेंबर 2020 पर्यंत 2,49,312 होते. दुसरीकडे, सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे स्वेच्छेने सोडण्याचे प्रमाण (कंपनी सोडणाऱ्या लोकांची संख्या) 20.1 टक्क्यांवरून 25.5 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर वर्ष-दर-वर्ष-YoY आधारावर ते 11 टक्के आहे.
कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर आमचा भर राहील. या अंतर्गत आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी कुशल बनवण्यावर भर देत आहोत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या हिताचाही आमच्या प्राधान्यक्रमात समावेश आहे.
Infosys ने 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर केले आहेत. या कालावधीत कंपनीला 5,809 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 5,197 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 23 टक्क्यांनी वाढून 31,867 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 25,927 कोटी रुपये होते. कंपनीने FY22 साठी 16.5-17.5 टक्क्यांवरून 19.5-20 टक्क्यांपर्यंत कमाईचा अंदाज वाढवला आहे. तिमाही आधारावर तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.