‘व्हायरस’ लागलेले सरकार ‘फॉरमॅट’ मारून 

‘डिलीट’ करा !: विखे पाटील*

नायगाव, जि. नांदेड, : विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे अनेक जण सरकारच्या सर्व नियम-कायद्यांना वाकुल्या दाखवत हजारो कोटी रूपये घेऊन पळून गेले. त्यांचे या सरकारला काहीही करता आले नाही. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की या सरकारला अटी व निकष आठवतात. या सरकारला अटी अन् निकषांचा ‘व्हायरस’ लागला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत शेतकऱ्यांनी ‘फॉरमॅट’ मारून हे सरकार‘डिलीट’ करण्याची आवश्यकता असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आज नायगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रसंगी विखे पाटील यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारवर चौफेर हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारला धारेवर धरताना ते म्हणाले की, तूर भावांतर योजनेचे पैसे असो, बोंडअळीचे पैसे असो, शेतकरी कर्जमाफी असो,आता दुष्काळचा प्रश्न असो, दरवेळी फक्त शेतकऱ्यांनाच अटी व निकष पूर्ण करण्याची सक्ती केली जाते. हे निकष इतके कठोर असतात की,शेतकऱ्यांसाठी निकष आहेत की निकषांसाठी शेतकरी आहेत? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते. अटी शिथील केल्याने जगाच्या या पोशिंद्याला दोन पैसे जास्त मिळाले तर सरकारचे काय बिघडते? अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारची तुलना रझाकारांशी केली. ते म्हणाले की, पूर्वी इंग्रजांनी आणि त्यानंतर रझाकारांनी मराठवाड्यावर प्रचंड अन्याय, अत्याचार केला. तसाच अन्याय आणि अत्याचार आज भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून मराठवाड्यावर अन् संपूर्ण देशावर सुरू आहे. शेतकऱ्यांप्रती या सरकारचा कळवळा १० टक्केही खरा असेल तर तातडीने दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. यंदाचा खरीप अगोदरच बुडाला आहे. जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेराही धोक्यात आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात घेतलेल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांचे सगळे कर्ज सरकारने सरसकट माफ करावे, अशीही मागणी त्यांनी मांडली.

पालकमंत्री रामदास कदम आणि शिवसेनेवरही त्यांनी फटकारे मारले. नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात दुष्काळ  ‘सदृश्य’ असला  तरी पालकमंत्री‘अदृश्य’ आहे.  संपूर्ण नांदेड जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला असताना पालकमंत्र्यांना दुष्काळाची साधी पाहणी करायला वेळ नाही. दसरा मेळाव्यात रामदास कदम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून मोठ-मोठ्या गोष्टी करत होते. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत होते. पण आपण सरकारमध्ये आहोत, हे शिवसेनेने विसरू नये. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून नव्हे तर मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. पण मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री एका शब्दानेही बोलत नाहीत, असा आरोप करून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळाच्या बैठकीत फक्त भजे खायला जातात का? असा सवाल केला.

पुढील निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने भाजप-शिवसेनेने आता राम मंदिराचा मुद्दा काढला आहे. रामाच्या नावावर लोक पुन्हा आपल्यालाच मतदान करणार, असा त्यांचा समज आहे. पण आता जनता यांना भुलणार नाही. आयुष्यभर पाप करून शेवटच्या दिवशी पुण्य केले म्हणून कोणाला स्वर्ग मिळत नाही. तसेच भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मागील चार वर्षात विकास दिसला नाही. अच्छे दिन आले नाहीत. १५ लाख रूपये मिळाले नाहीत. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले नाही. पाकिस्तानला धडा शिकवला नाही. त्यामुळे या देशातील नागरिक पुन्हा यांच्यावर विश्वास ठेवाणार नाहीत.  म्हणूनच देशासमोरील सर्व समस्या सोडून हे सरकार निवडणुकीच्या तोंडावर राम-राम करायला लागले आहे. अशा फसव्या सरकारला आता आपण कायमचा‘आराम’ दिला पाहिजे, असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना केले.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!