दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, शेतकऱ्यांची फसवणूकच !
राधाकृष्ण विखे पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर  : 1 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.
अहमदनगर जिल्‍ह्यातील  सर्व तालुका काँग्रेस कमिटींचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष,पदाधिकारी आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील नुकत्‍याच निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्‍यांच्या सत्‍कार समारंभात ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले की, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे.राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर  सरकाराचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ घोषणाबाजी करून मीडियात फोटो छापून आणण्याचा एककलमी कार्यक्रम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. नांदेड महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले अ‍भूतपूर्व यश हे सरकारच्‍या विरोधातील असंतोषाचा उद्रेक असून, मतदारांनी सरकारला एकप्रकारे धडा शिकवला आहे. निवडणूक प्रचारात शेतीला 12 तास सलग वीज देण्‍याची घोषणा करणाऱ्या सरकारने राज्‍याला अंधारात ढकलले आहे. यवतमाळमध्‍ये 19 शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही कृषिमंत्री तिथे तातडीने पोहचू शकले नाही असा हल्लाबोल विखे पाटील यांनी सरकारवर केला. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्‍हा काँग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष जयंत ससाणे, शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्‍यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, पंचायत समितीच्‍या सभापती हिराबाई कातोरे,बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, सचिन गुजर, काशिनाथ लवाडे,राजेश परजणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!