केडीएमसीत ओपन लॅण्ड टॅक्ससाठी, 15 कोटीचं डिल ?
सामान्यांच्या मालमत्ता कर कधी कमी होणार

कल्याण / संतोष गायकवाड  : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यात आलाय. ओपन लॅण्ड टॅक्स कमी करून बिल्डरधर्जिणा निर्णय घेण्यात आल्याने, आता सामान्य नागरिकांचा मालमत्ता करही कमी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी कल्याण डोंबिवलीत जोर धरू लागलीय. ओपन लॅण्ड टॅक्स प्रकरणात सुमारे १५ कोटीचं डील झाल्याची दबकी चर्चा आता कल्याण डोंबिवलीत रंगलीय. त्यामुळे ओपन लॅण्ड टॅक्सचा विषय भविष्यात चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर महापालिकेच्या तुलनेत केडीएमसीत ओपन लॅण्ड टॅक्स अधिक असल्याने कमी करण्यात यावा अशी मागणी कल्याण डेांबिवलीतील बिल्डरांनी केली होती. काही दिवसांपूर्वी बिल्डरांनी महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलनही छेडलं होतं. त्याचवेळी मंत्रालयात कॅबिनेटच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यासाठी सुत्रे हलली. ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्याचा प्रस्ताव एवढया तत्परतेने प्रशासनाकडून महासभेत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी मिळाली. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानेच ही तत्परता दाखवण्यात आल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत सुरू आहे. या मंजुरीमुळे १०० टक्के आकारला जाणारा ओपन लॅण्ड टॅक्स आता ३३ टक्के आकारला जाणार आहे. ओपन लॅण्ड टॅक्स प्रमाणेच सामान्य नागरिकांचा मालमत्ता करही सगळयात अधिक ७३ टक्के आहे त्यामुळे तो करही कमी करण्यात यावा अशी मागणी जेार धरू लागलीय. कल्याणचे जागरूक नागरिक श्रीनिवास घाणेकर यांनी सेवा नाही तर कर नाही अशा स्वरूपाचे आंदोलन करू केलयं त्यांच्या आंदोलनाला चांगला पाठींबा मिळतोय. त्यामुळे मालमत्ता कराच्या बाबतीत राज्य सरकार, पालिका प्रशासन- सत्ताधारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *