पोलीसांसाठी ओपन जीम व अभ्यासिका

मुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजात शांतता राखण्यासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे मनोबल व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस मुख्यालयात ओपन जीम साकारण्यात आली आहे. शुक्रवारी ओपन जीम आणि स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडलं. पोलीस मुख्यालयात पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी १५ लाख रुपये खर्चून ओपन जीम साकारण्यात तर सुमारे साडेसात लाख रुपये खर्चून स्वामी विवेकानंद अभ्यासिका साकारण्यात आली आहे. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उप-अधीक्षक सतीश माने यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ज्यांच्या जीवावर कायदा व सुव्यवस्था अबाधित असते ते पोलीस व त्यांचे कुटुंबिय यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणत्याही चांगल्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. अभ्यासिकेसाठी जिल्हा सर्व साधारण योजनेतून साडेतीन लाखांचा निधी पुस्तकांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. पोलीस व त्यांच्या कुटुंबियांनी ओपन जीम व अभ्यासिकेचा जास्ती जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, पोलीस कल्याणासाठी पालकमंत्री अत्यंत सकारात्मक आहेत. स्वातंत्र्य पूर्वकाळातील पोलीस कॉटर्सची दुरुस्ती करुन त्यानी पोलीसांना राहण्यायोग्य कॉटर्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटील यांनी पालकमंत्रयाचे आभार मानले. तसेच लवकरच पोलीसांच्या पाल्यांसाठी सीबीएससी शाळा तसेच दोन पेट्रोल पंप सुरु होतील व त्यातून पोलीस कल्याणाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शहर पोलीस उप-अधीक्षक प्रशांत अमृतकर, केएसबीपीचे सुजय पित्रे, पोलीस उप- अधीक्षक सतीश माने, गांधीनगर पेालीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राखीव पोलीस दलाचे श्री. वरेकर, आरएसपीचे राजू शिंदे यांचा, पोलीस कल्याण निधीतून विविध कामे उत्कृष्टपणे केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *