डोंबिवली : ऑनलाईनच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे अमिष दाखवणाऱ्या भामट्यांनी बँक खात्यात काही बोनसपात्र रक्कम जमा करायची असल्याचे सांगून कल्याण-डोंबिवलीतील दोन घटनांमध्ये गेल्या आठवड्यात 9 जणांची तब्बल 1 कोटी 26 लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
डोंबिवली जवळच्या पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या तनुश्री अशोक जुग्रान या खासगी नोकरी करतात. त्यांचे ॲक्सिस बँकेत खाते आहे. गेल्या आठवड्यात तनुश्री यांना एका अनोळखी इसमाने फोन केला. ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगणाऱ्या इसमाने बँक खात्यावर काही बोनसपात्र रक्कम जमा करायची असल्याचे तनुश्री यांना सांगितले. त्या इसमाने तनुश्री यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. ॲक्सिस बँकेतून फोन आल्याने तनुश्री यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. बोलण्याच्या ओघात भामट्याने तनुश्री यांच्याकडून गुप्त कोड क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर भामट्याने तनुश्री यांच्या बँक खात्यात छेडछाड करून ॲक्सिस बँकेकडून तनुश्री यांच्या नावाने 10 लाख 72 हजार रूपयांचे कर्ज घेतले. ही रक्कम तनुश्री यांना अंधारात ठेऊन परस्पर भामट्याने काढून घेतली. अशाच पध्दतीने भामट्याने इतर सात जणांची फसवणूक करण्यात आली आहे. तनुश्री यांच्या अर्जावरून मानपाडा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर चव्हाण अधिक तपास करत आहेत.
गेल्या वर्षभरापासून कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून बँक खातेदारांना फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये, अन्यथा फसगत होण्याची दाट शक्यता असते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.