ठाणे : ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरु झाली असून या बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा ०१ सप्टेंबर, २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण ४० स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ७ घाट, १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधा १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असणार आहे. सदर ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करावा.
ठाणेकरांनी www.ganeshvisarjan.covidthane.org या लिंकवर जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट बुक करावे. नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे आलेली क्यूआर कोड रिसिट डाऊनलोड करून ठेवावी तसेच कोडची प्रिंट अथवा मोबाईलमधील कोड विसर्जन स्थळी असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवून श्रींचे रीतसर विसर्जन करावे. या संबधी काही तांत्रिक अडचण असल्यास ९८१९१७०१७० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सर्व गणेश भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.