कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक
मुंबई दि. २८ फेब्रुवारी – कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात आक्रमक झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, नाफेडकडून कांदा खरेदी सुरू असल्याचे सांगितले कांदा निर्यातीवरही बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल अशी घोषणाही शिंदे यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी कांद्याचा प्रश्न लावून धरला. प्रश्नावरून सरकारला धारेवर धरीत सभागृहात हा मुद्दा लावून धरला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरले.
कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असून, निर्यातीला चालना देण्यासह नाफेडमार्फत खरेदीच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी धोरण जाहीर करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निक्षापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केल्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत २.३८ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’,…. विरोधकांनी घोषणाबाजी
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजेत’, अशा घोषणांनी विरोधकांनी विधिमंडळाचा परिसर दणाणून सोडला. सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा रे सरकार खोके सरकार… शेतकऱ्यांचा कांदा सरकारने केला वांदा… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा : अजित पवार
सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले. अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनपैकी जवळपास 50 टक्के शेतकरी हा सोयाबीन उत्पादक आहे. देशाच्या सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. साधारणत: सोयाबीन उत्पादनाचा प्रतीक्विंटल उत्पादन खर्च 5 हजार 783 रुपये आहे. सद्याचा बाजारभाव रु.5 हजार ते 5 हजार 500 या दरम्यानच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला दरवाढ मिळावी यासाठी त्यांचे आंदोलन होते. कापूस पिकालाही यावर्षी 8 हजार 184 रुपये उत्पादन खर्च आलेला आहे. तर सध्याच्या कापसाचा बाजारभाव 7 हजार 500 ते 8 हजार 500 दरम्यानच आहे. सातत्याने सोयाबीन व कापसाच्या भावात चढउतार होत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनसाठीचे हे आंदोलन होते. या आंदोलनानंतर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना स्थानबध्द करून त्यांना तातडीने दवाखान्यात नेले नाही. त्या ऐवजी त्यांचेसोबत आलेल्या शेतकऱ्यांवर बेछूटपणे लाठी हल्ला केला त्यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांचा समावेश होता. तसच तिथे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांनासुद्धा धक्का बुक्की करत मारहाण करण्यात आली एकंदरीत लाठी हल्ला हा पुर्व नियोजित कट होता. तुपकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर अनेक विद्यमान व माजी विधानसभा सदस्यांना .तुपकर यांना भेटू दिले नाही. सनदशीर मार्गाने होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशी कृत्ये केली जात असून पोलीस अधिकाऱ्यांचे मदतीने त्यांचेवर गंभीर गुन्ह्यातील कलमे लावण्यात आली आहेत.यामध्ये पोलीस अधिकारी जाणूनबुजून त्यांना त्रास देत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.