ठाणे (२६): ठाणे महानगरपालिका हद्दीत गणेशोत्सवासाठी प्रसंगी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज उपलब्ध करण्यासोबतच मंडळांना संबंधित प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र येथील एक खिडकी योजनेद्वारे देखील अर्ज सादर करता येणार आहेत. या दोन्ही पध्दतीने सादर केलेल्या अर्जांची छाननी केल्यावर संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज दिली. तसेच ठाणेकरांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक,सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून उत्साहात साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ठाणे महापालिका, पोलीस यंत्रणा,वाहतूक पोलीस, महावितरण, गणेशोत्सव मंडाळाचे प्रतिनिधी, गणेश मूर्तिकार यांच्या समवेत समन्वय बैठक पार पडली. शासनाने २०२२ च्या गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप परवानगी शुल्क व अनामत रक्कम न घेण्याबाबत निर्णय घेतला आहे याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
एक खिडकी योजना
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रभाग समिती क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र येथील एक खिडकी योजनेद्वारे देखील अर्ज सादर करता येतील. यामध्ये वाहतूक पोलीस व पोलीस प्रशासन यांच्या प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व संबंधित प्रभाग समितीकडून परवानगी प्रदान करण्यात येणार आहे. महावितरणनेही यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.
ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा सदर सुविधा tmc.infosoftech.co.in/ Mandaponline.html या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन सुविधेमध्ये मंडप परवानगीसाठी पोलीस विभाग, वाहतुक पोलीस विभाग व अग्निशमन विभाग यांचा ना हरकत दाखला ऑनलाईन पध्दतीने api.infosoftech.co.in/#/login या लिंकवर ऑटो जनरेट पध्दतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील. अन्यथा परवानगी नाही असे गृहित धरुन महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे
दरम्यान उत्सव किंवा कार्यक्रमास, मंडप, स्टेज व कमानी उभारण्याकरिता महापालिकेने सविस्तर कार्यपध्दती निश्चित केली असून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र.१७३/२०१० मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन सर्व उत्सव मंडळांनी करणे बंधनकारक असणार आहे.
मंडळाशी संवाद
आजच्या बैठकीत ठाण्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होते. त्यांनी गणेश आगमन ते विसर्जन सुविधा,त्यांची व्यवस्था,येणाऱ्या अडचणी मांडल्या .त्याला आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रतिसाद दिला. तसेच कोविड काळानंतर होत असलेल्या या उत्सवात मोठ्या जल्लोषात सहभागी होताना ठाण्याची उत्सवप्रियतेची सकारात्मक परंपरा कायम राखावी असे आवाहनही डॉ. शर्मा यांनी केले.
नोडल अधिकारी
गणेशोत्सव काळात महापालिकेच्या परवानगी,व्यवस्था आदींबाबत काहीही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी उप आयुक्त जी.जी. -गोदेपुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परवानगीबाबत काही अडचणी असल्यास ८६५७८८७१०१ या –क्रमांकावर संपर्क साधावा.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीच्या उंचीचे निबंध शासनाकडून हटविण्यात आलेले आहे. त्यामुळे गणेश मूर्तीचे आगमन व गणेश मूर्तीचे विसर्जन मार्गावरील ओवरहेड वायरची पाहणी करून कमी उंचीवर असलेले ओव्हरहेड वायरची उंची वाढविण्याचे काम तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांना नियमानुसार वीज पुरवठा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी महावितरण विभागास दिल्या.
गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक तो पोलीस यंत्रणा आगमन / विसर्जन मार्गावर तसेच कृत्रिम तलावाच्या ठिकाणी व विसर्जन घाटावर कार्यान्वित ठेवण्याबाबत पोलीस विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परिमंडळ पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी यावेळी सांगितले. सण-उत्सवांच्या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारे मंडप, स्टेज व ध्वनी प्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.१७३/२०१० च्या अनुषंगाने दिलेले आदेश व कायदेशीर तरतुदींची माहिती देण्याकरिता प्रभाग समिती स्तरावर मंडळांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.