मुंबई : ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांचा एक प्रमुख भाग म्हणजे कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या ! बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० पासून करण्यात येत असलेल्या या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. यानुसार २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे…
‘कोविड – १९’ या साथ रोगाचा पहिला रुग्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये आणि निर्धारित केंद्रांमध्ये या चाचण्या मोफत करण्यात येत आहेत. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा मध्ये देखील या चाचण्या करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे आहे..
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २६० चाचणी केंद्रांवर कोविड विषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते. या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या या कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. ज्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्या वेळी औषध उपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्ती पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.