मुंबई : कोरोनाच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा उपाय असल्याने जगासह देशभरात लसीकरण मोहिम राबविण्यात आली, मुंबईने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० (९९ टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

मुंबईसह देशभरात दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱयांसाठी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१; ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी दिनांक १ मार्च २०२१; ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी दिनांक १ एप्रिल २०२१; १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक १ मे २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले.

लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरु केल्यानंतर दिनांक ५ मे २०२१ रोजीपर्यंत २५ लाख मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला. त्यानंतर दिनांक २६ जून २०२१ रोजी ५० लाख, दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख, दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी, दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख आणि आता दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख लसीच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या लसीकरणाचा विचार करता पहिली व दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!