मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ऑथिरीटी प्राधीकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेवून या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित,अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबादेवी हे प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात.श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन स्थित महाकाल मंदिर कॉरिडॉर,तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणा-या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, पार्किंग व येथे आवश्यक असणा-या परिसराच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.