दीड वर्षापासून वेतन न मिळाल्याने हजारो कामगार देशोधडीला ..
ठाणे (संतोष गायकवाड ) : येथील सुपरमॅक्स पर्सनल केजर प्रा. लि. ही बेल्ड बनविणारी कंपनी बंद पडल्याने आणि ऑक्टिस व्यवस्थापनाकडून कामगार/कर्मचा-यांना गेल्या दिड वर्षापासून वेतन न दिल्याने हजारो कामगाराना बेरोजगार झाले असून, कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. कामगारांच्या आत्महत्यांच्या घटना वाढत आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन आणि राज्य सरकरकडून ठोस पाऊल उचलली जात नसल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेकडो कामगारांनी कंपनी बाहेर रस्त्यावर बेमुदत साखळी आंदोलन पुकारीत ठिय्या मारला आहे. मुख्यमंत्री साहेब न्याय द्या अशी मागणी कामगारांनी केली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कामगार न्याय हक्कासाठी झगडत आहेत. मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. कामगारांना दीड वर्षापासून पगार न मिळाल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे अनेकांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. अनेकांच्या गृहकर्जाचे हप्ते न भरल्याने बँकानी घरे लिलाव करण्याची सुरुवात केली आहे. तर कर्जाच्या रक्कम भरू न शकल्याने बँकांचा तगादा कामगारांच्या मागे सुरू आहे. त्यामुळे कामगार हवालदिल झाला आहे. मात्र ठाण्यातील कामगार देशोधडीला लागला असला तरी व्यवस्थापन अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी सुपरमॅक्स ब्लेडचे उत्पादन जम्मू मधील साबरीया कंपनी कडून तसेच वापी येथुन उत्पादन काढत आहेत अशी माहिती कामगारांकडून देण्यात आली. तसेच व्यवस्थापनाने सुपरमॅक्स कंपनी जाणीवपूर्वक तोट्यात दाखवली असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.
व्यवस्थापनाचे षड्यंत्र…
सुपरमँक्स व्यवस्थापनाने २१ नोव्हेंबर २०२२ कंपनी लॉकआऊटची नोटीस लावली. कामगार न्यायालयात ते बेकायदेशीर घोषित केले आहे. ८ डिसेंबर २०२२२ रोजी उपाहारगृहाचे पैसे न दिल्याने उपाहारगृह बंद करून कामगारांना घरी रहा व तुमची हजेरी लावली जाईल या आशयाची नोटीस लावली, तेव्हापासुन कंपनी उत्पादन बंद आहे. त्यानंतर वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन कापण्यात आले. कामगारांना कंपनीत येऊ न देण्यासाठी ही सर्व षड़यंत्रे व्यवस्थापनाने रचल्याचा आरोप कामगारांनी केला.
कामगारांच्या आत्महत्या
सुपरमॅक्स हैदराबाद कारखान्यातील एका कर्मचाऱ्याला वर्षभरापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक स्थिती बिकट झाल्याने त्याने आत्महत्या करून जीवन संपवले. ठाणे आणि हैद्राबादमध्ये अनेक कामगारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ॲक्टीस च्या शिरकावानंतर उतरती कळा
सन २००९ पासून अल्प शेअरहोल्डर म्हणून कंपनीत ॲक्टीस Actis मॅनेजमेंटचा शिरकाव झाला. जागतिक दर्जाचे व्यवस्थापन, सुवर्ण मानांकन, उत्पन्नात वाढ असे आश्वासन देऊन करार करण्यात आला. परंतु या कराराविषयी कोणतीच माहिती कामगारांना देण्यात आली नाही.ऑक्टिसने हळू हळू कंपनीवर ताबा मिळवला आणि त्यानंतर कंपनीला उतरती कळा लागल्याचे कामगार सांगतात.
६५ कोटीहून अधिक रकमेची देणी
सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाद्वारे, त्यांना कायदेशीररीत्या देय असलेली रु. ६५ कोर्टीहून अधिक रक्कम, वेतन पगार थकबाकी यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासूनचा दिवाळी बोनस दिलेला नाही. २०१९ पासून सेवानिवृत कामगारांचे प्रत्येकी १२ ते१३ लाखांची सेवानिवृत्त देणी देण्यात आलेली नाही हि देणी जवळपास २५ कोटी रूपये आहे. तसेच कोरोना काळात मयत झालेल्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या वारसांना मयत ग्रॅज्युटी दिलेली नाही असे कामगारांनी सांगितले. त्यामुळे कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कामगारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.