मुंबई, दि. १०ः मराठा – ओबीसी आरक्षणाच्या विशेष बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावरून बुधवारी विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी – विरोधक यावेळी आमनेसामने आल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
आमदार प्रवीण दरेकर यांनी आरक्षणासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. राज्यात जातीय सलोखा बिघडून गावागावांत जातीय तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांसह महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि याठिकाणी मार्ग काढावा, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पक्षप्रमुखांना पत्रव्यवहार केला. परंतु, विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधकांचे पुतना मावशीचे प्रेम यातून समोर आल्याची टीका
दरेकर यांनी केली. विरोधक त्यामुळे चांगलेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दरेकर यांना प्रत्युत्तर देताना, बैठकीपूर्वी मराठा – ओबीसी नेत्यांशी परस्पर सरकारने केलेल्या चर्चेची माहिती सभागृहाला देण्याची विनंती केली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नसल्याचे सांगत टीकास्त्र सोडले. दरम्यान, सत्ताधारी – विरोधक वेलमध्ये आमनेसामने येऊन घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे आमदार एकत्र आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवा, असे आवाहन करत मार्शलला बोलवण्याची वेळ उपसभापतींवर आली.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात सभागृहाचे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्तांनी राज्यापालांना दिलेला अहवाल, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा सन २०२२-२३ वर्षाचा साठावा वार्षिक अहवाल, सिडको महानगर -३ प्रकल्पबाबतची कागदपत्रे, ९३ अन्वयेची सूचना, पुरक व पुरवणी मागण्या पटलावर सादर करून परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. ***