नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकवला. यावेळी मोदी यांनी तिरंग्याला सलामी दिली. मागचे सलग दहा वर्षे नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त करीत आपल्या भाषणात भारताच्या भविष्याचा वेध घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीकाही केली. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण ही देशाला लागलेली कीड आणि ही भारतीय राजकारणाला लागलेली आहे. ती कीड नष्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तो मी करेनं. तर लाल किल्ल्यावरुन पुन्हा मी तुमचे आर्शीवाद मागत आहे. भारताच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करीत आहेत. कठोर परिश्रम घेतलं आहे, देशासाठी घेतलं आहे असे मोदी म्हणाले.
भारत देश हा युवांचा देश आहे. मला देशातील तरूणांवर विश्वास आहे. देश प्रगती करतो आहे. येत्या काळात आपण आणखी पुढे जाऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला.