विधानपरिषदेत पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही वक्तव्यावर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्रयांनी खुलासा करावा अशी जोरदार मागणी लावून धरली.
यावेळी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मात्र सभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावत कामकाज रेटून नेले. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरून मुख्यमंत्री आणि सभापती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ सभागृहातील वातावरण तंग बनले होते. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबात औचित्याचा मुद्दा मांडला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना चहा पाण्याचे निमंत्रण देणे, ही प्रथा आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना निमंत्रण दिले. मात्र राज्यातील घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे. त्यांच्या चहापाण्याची निमंत्रण स्वीकारणे हा महाराष्ट्रद्रोह ठरला असता.
जनतेशी प्रतारणा ठरले असती. तसेच, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, रोजगार, उद्योगधंदे देण्यास सरकारची अपयशता आदी मुद्दयांवरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करीत, राज्य सरकारच्या निमंत्रणावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. तसे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोही लोकांबरोबर चहा पान झाला नाही हे बर झालं अस वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निषेध केला. देशद्रोही कोण ? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. हे विधान कशाच्या आधारे केले हे स्पष्ट करावे.
मुख्यमंत्र्यांचे विधान लोकशाहीला घातक आहे असा संताप दानवे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. यावेळी विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला. सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
माजी विधान परिषद सदस्य दिवंगत लक्ष्मण जगताप, जयप्रकाश छाजेड आणि सुमंत गायकवाड या सदस्यांचे नुकतेच निधन झाले. सभापती नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात शोक प्रस्ताव मांडला. विरोधकांनी यानंतर आंदोलन आवरत घेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली. तसेच विधान परिषदेचे नवनियुक्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, काँग्रेसचे सुधाकर अडबाळे, धीरज लिंगाडे, अपक्ष सत्यजित तांबे आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत करण्यात आले.