नवी दिल्ली : जगाची डोकेदुखी ठरलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता भारतात शिरकाव केलाय. कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिलीय. देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने केंद्र आणि राज्य सरकार आता सतर्क झालय.
कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनने दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवलाय. ओमिक्रॉनचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अधिक वेगानं होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले ९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. दक्षिण आफ्रिकेतून दोन उद्योजक कर्नाटकात उतरले. त्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झालय. दोन रुग्णांपैकी एक रुग्ण ६६ आणि दुसरा रुग्ण ४६ वर्षे वयाचा आहे. शेजारी असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आल्याने देश आणि महाराष्ट्रात चिंता व्यक्त केली जातेय.
आतापर्यंत २९ देशांमध्ये ३७३ ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. एका अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो. ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचं सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. “घाबरून जाण्याची आवश्यकता नसली, तरी सतर्क राहाणं आवश्यक आहे. कोविडचे नियम पाळणं आणि गर्दी टाळणं हे महत्त्वाचं आहे”, असं लव अग्रवाल म्हणाले.