मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भितीचे वातावरण पसरलं असून, तिथल्या प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतातही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून हा सल्ला दिलाय. महाराष्ट्रातही निर्बंधाची नवी नियमावली येण्याची शक्यता आहे.
ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट हा सर्वात घातक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे जगभरातील देशांनी कोरोनाच्या नव्या विषाणूचा धसका घेत दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर निर्बंध आणले आहेत. इस्त्रायलमध्येही नव्या व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळून आल्याने प्रवासावर निर्बधं आलेत. तसेच पाकिस्तानाने प्रवासासंबधित निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटनने प्रवासाच्या बंदीबरोबरच कोरोनाचे नियम कठोर केले आहेत. पदेशातून येणाऱ्यांची पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यता आली असून, नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यास त्याचं लसीकरण झालं असलं तरी विलगीकरणात जावं लागणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी खबरदारी घेण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. या पत्रात ‘जोखीम’ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा आणि १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना चाचण्या वाढविण्याचे आणि हॉटस्पॉट भागात कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.