कल्याण  (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ३० ते ४५  वर्षापासून असलेल्या जुन्या इमारतींना बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ४ चटईक्षेत्र (एफएसआय) द्यावा यासाठी मंत्रालयात बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी कॉग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
 

महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात स्थानिक भूमिपूत्र शेतकरी बांधव शेती करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यानंतर लोकवस्ती वाढली सर्वसामान्य नागरिकांना घर मिळावी व कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा या हेतूने त्या काळात परवडणारी घरे भाडेतत्वावर बांधून देण्यात आली. १९८३ ते १९९५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती. शहराच्या विकासासाठी स्थानिक आगरी कोळी भूमीपुत्रांनी आपल्या जमिनी विविध आरक्षणासाठी दिल्या. मात्र जमिनी आरक्षित झाल्यानंतर भूमीपुत्र भूमिहिन झाला आहे. गेल्या ३० ते ४० वर्षापासून जुन्या इमारती असून आता त्या धोकादायक झाल्या आहेत. त्यात अनेक भाडेकरू जीव मुठीत धरून राहतात तर अनेक भाडेकरूनी ताबा ठेवून इतरत्र राहत आहेत. त्यामुळे विकास नाही आणि भाडेही मिळत नाही.

महापालिकेच्या नियमाप्रमाणे सध्या एक चटई क्षेत्र (एफएसआय) देण्यात येत आहे तसेच जुन्या व धोकादायक बांधकामांना सध्याच्या अटी शर्थी प्रमाणे जमीन मालक यांना मोबदलाही मिळत नाही  व तेथे रहिवाशांना घरे देणेही शक्य होत नाही त्यामुळे वाढीव चटई क्षेत्र मिळाल्यानंतर जमीन मालक व रहिवाशांना त्याचा मोबदला मिळणार आहे तसेच मालमत्ता कराचे उत्पन्नात भर पडेल आणि सरकारी जमिनीवरील महसूल शासनाला मिळेल असे केणे यांचे म्हणणे आहे.  ****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!