ठाणे १० ऑगस्ट : कोविड १९ लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता यावा यासाठी बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ पासून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या चार रेल्वेस्थानकावर मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. नागरिकांची कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया करुन त्या आधारे नागरिकांना मासिक रेलवे पास रेल्वेकडून देण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुकत डॉ.विपिन शर्मा यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण आज देण्यात आले.

कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अॅपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी उद्या (बुधवार) दिनांक ११ ऑगस्ट २०२१ पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळ आल्यानंतर, तेथे ठाणे महानगरपालिका यांच्याद्वारे स्थापन केलेले मदत कक्ष (हेल्प डेस्क) असतील. हे मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील.

मदत कक्षावरील ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.

कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर जेवढ्या तिकिट खिडक्या असतील, तेवढ्याच संख्येने मदत कक्ष देखील असतील. तसेच सकाळी ७ ते रात्री ११ अशी तब्बल १६ तास पडताळणी सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची सक्त नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरु राहील. त्यामुळे त्यांनी नियमित पद्धतीने उपनगरीय रेल्वे प्रवास करावा, असे कळविण्यात येत आहे.

शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. तथापि, त्यास आणखी काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता, टप्प्या-टप्प्याने तसेच ज्यांना अधिक आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्य देवून पडताळणी पूर्ण करुन मासिक पास प्राप्त करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, मासिक पास प्राप्त करणे अतिशय सुलभ होणार आहे. ती व्यवस्था देखील पुढील आदेश येईपर्यंत सुरु राहील.

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.‍विपीन शर्मा यांनी केले आहे.

……………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *