गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
डोंबिवली : शस्त्रांचा धाक दाखवून गुन्हे करणाऱ्या सनी तुसांबड या सराईत गुन्हेगाराला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. पश्चिम डोंबिवलीतील रेल्वे ग्राऊंडवर लुटारू सनी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी वर्तविली आहे.
पूर्वेकडील बंदिश चौकातील कालीकामाता चाळीत राहणारे रणजित शंकर गलांडे (३८) हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेलार नाक्यावरून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले. एवढ्यात सनी तुसांबड आणि त्याचा साथीदार अक्षय अहिरे या दोघांनी रणजित यांच्या पोटाला चाकू लावला. चिल्लाया तो काट डालेंगे, अशी धमकी देऊन मारहाण केली. त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला. दुकलीने पुन्हा चाकूचा धाक दाखवून रणजित यांच्या मोबाईलमधील गुगल-पे चा युपीआय आयडी पिन नंबर मागवून घेतला आणि त्यांच्या गुगल-पेच्या आधारे बँक खात्यातून १२ हजार १०० रूपये काढून दोघेही लुटारू पसार झाले. रणजित गलांडे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हवा. विश्वास माने आणि पोशि गुरूनाथ जरग यांना मिळालेल्या माहितीनुसार सनी तुसांबड हा पश्चिम डोंबिवलीतील बावन्न चाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सपोनि संदीप चव्हाण, उपनि संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. बापूराव जाधव, पोशि गुरूनाथ जरग, पोशि गोरक्ष शेकडे या पथकाने सनी तुसांबड याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याचा साथीदार अक्षय अहिरे याचाही शोध घेण्यात येत आहे.