मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्या कोणती प्रक्रिया सुरु आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे.यावर उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केले होते. या सुनावणीला आता तीन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांमध्य उत्तर देण्याचे निर्देश दिले.
येत्या दोन आठवड्यांमध्ये राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे. यावेळी राहुल नार्वेकर काय सांगतात, हे पाहावे लागेल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना कोणते निर्देश देणार का, हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील मुद्दा लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकते. त्यादृष्टीने राहुल नार्वेकर यांची प्रत्येक भूमिका आणि कृती आता महत्त्वाची ठरणार आहे.
याबाबत बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नोटीस माझयापर्यंत आलेली नाही. त्या नोटीसचा अभ्यास करून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले