नागपूर : राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण ठरविले असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रस्तावाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. या चर्चेत सदस्य आमश्या पाडवी यांनी सहभाग घेतला.
मंत्री केसरकर म्हणाले की, राज्यातील कुठल्याही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वीज पाणी यांसह विविध शैक्षणिक सुविधांसाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्या देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.