वाहनांच्या निर्यातीसाठी जलमार्गाचा वापर करा : नितिन गडकरी यांचे वाहन कंपन्यांना आवाहन
चेन्नई (अजय निक्ते) – रस्त्यांच्या मार्गाने वाहतूक करणे महागडे आहे. यामुळे पर्यावरणात प्रदूषणही वाढते. अपघात होण्याचाही धोका असतो. त्यामुळे वाहनांची निर्यात करताना जलमार्गाचा वापर करा असे आवाहन केंद्रीय जहाज बांधणी, रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना केले आहे. चेन्नईमध्ये अशोक लेलँडच्या ट्रकांची बांगलादेशात निर्यात करण्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. नागपूरमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्यांनी नागपूरमधूनच अशोक लेलँडच्या १८५ ट्रकचा पहिला जथ्था चेन्नई बंदरावरून बांगलादेशातील मोंगला बंदरासाठी रवाना केला. हे ट्रक ‘रोरो’च्या माध्यमातून पाठवण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये जलमार्गाने वस्तूंची आयात-निर्यात करण्यासंबंधी करार झाला होता. त्या कराराची आठवण गडकरी यांनी करून दिली. भारत-बांगलादेश दरम्यान झालेल्या करारानुसार भारतापासून ते बांगलादेशपर्यंतच्या समुद्री वाहतुकीला कोस्टल मूव्हमेंट मानले जाते. यात जहाजासंबंधी तसेच कार्गो संबंधी शुल्कात ४० टक्के सूट देण्यात येते. रोरो जहाजाच्या कोस्टल मूव्हमेंटमध्ये भारतीय बंदरांवर जहाजा तसेच कार्गो शुल्कात ८० टक्के सूट दिली जाते असेही त्यांनी सांगितल. अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार यांनी सांगितले की, कंपनी ४० वर्षांपासून रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून ट्रक निर्यात करते. यात कंपनीला सीमेवरील रस्त्यांवर वाहतूक कोंडी, सीमा ओलांडताना उशीर अशा अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळेच सरकारच्या सल्ल्यानुसार आम्ही सागरी मार्गाने ट्रक निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी दरवर्षी बांगलादेशात ५,००० ट्रक निर्यात करते असेही त्यांनी स्पष्ट केलं.