निळजे पोस्ट ऑफिसच्या स्थलांतरास गावकऱ्यांचा विरोध …सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी एकवटले.
डोंबिवली :- डोंबिवलीजवळील निळजेनिळजे पोस्ट ऑफिसच्या स्थलांतरास गावकऱ्यांचा विरोध … गावातील पोस्ट ऑफिस लोढा येथे स्थलांतर करून पलावा पोस्ट ऑफिस असे नामकरण करण्यात येणार आहे. मात्र याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय. गुरुवारी डाक विभागाचे अधिकारी या पोस्ट ऑफिस मधील दफ्तर घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी आणि गावकरी पोस्ट ऑफिससमोर जमा झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील डाक विभागात अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोस्ट ऑफिसचे स्थलांतराला विरोध असून निळजे येथेच ऑफिस ठेवावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला.
निळजे, निळजेपाडा, घेसर, संदप, उसरघर, भोपर, कॅसा बेला, कॅसा रिओ गोल्ड, लोढा हेरीटेज, नवनीतनगर, पलावा या वसाहतींना निळजे येथील पोस्टाची सेवा पुरविण्यात येते. मात्र डाक विभागाकडून अचानक निळजे येथील पोस्ट ऑफिसचे स्थलांतर होणार असल्याचे समजताच सर्व पक्षिय युवा मोर्च्याचे पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शविला आहे. याबाबत गजाजन पाटील यांनी सांगितले की, गावकऱ्यांना विश्वासात न घेता येथील पोस्ट ऑफीसचे स्थलांतर करणे चुकीचे आहे. यामुळे गावकऱ्यांना त्रास होणार असून या पोस्ट ऑफिसचे नाव `पलावा पोस्ट ऑफिस` करू नये. सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी गजानन पाटील, गिरीधर पाटील, महेंद्र पाटील, प्रेमनाथ पाटील, सतीश पाटील यांनी ठाणे येथील डाक विभागाचे वरिष्ठ निरीक्षकाची भेट घेऊन निवेदन दिले.