निळजे पोस्ट ऑफिसच्या स्थलांतराला ब्रेक ! : केंद्रीय मंत्र्यांचे खासदारांना आश्वासन : ग्रामस्थांचेही ठिय्या आंदोलन
डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट ऑफिस स्थलांतर करून नाव बदलण्याचा घाट सुरू आहे, याला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवित आंदोलन छेडलंय. याच पार्शवभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची आज दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान मनोज सिन्हा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सध्या अस्तित्वात असलेले पोस्ट ऑफिस हलवले जाणार नाही याची ग्वाही दिली. तसेच या पोस्ट ऑफिसचे नावही बदलले जाणार नाही असेही आश्वासन खासदारांना दिलंय. तर आज ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत ठिय्या आंदोलन केलं.
निळजे गावातील पोस्ट ऑफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला आहे. निळजे गावातील लोकांनी गावातच पोस्ट ऑफिससाठी जागा उपलब्ध करून देण्यास येथील गावकऱ्यांनी तयारी दाखविली असल्याचेही खा.डॉ. शिंदे यांनी सिन्हा यांना सांगितले. त्यावर पलावा येथे सुरू होणारे पोस्ट ऑफिस निळजे गावातच सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुचना करण्यात येतील असेही सिन्हा यांनी सांगितले.
गावकऱ्यांचे ठिय्या आंदोलन ….
निळजे गावातील पोस्ट ऑफिस स्थलांतर करून लोढा पलावा येथे केले जाणार असून या पोस्ट ऑफिसचे नामकरण पलावा पोस्ट ऑफिस करण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले. शुक्रवारी डाक विभागाचे अधिकारी या पोस्ट ऑफिस मधील दफ्तर घेण्यासाठी येणार असल्याचे समजताच सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी आणि गावकरी पोस्ट ऑफिससमोर जमा झाले. पोस्ट ऑफिसचे स्थलांतराला विरोध करत गावकऱ्यांनी पोस्ट ऑफिस समोर ठिय्या आंदोलनकेले. यावेळी सर्व पक्षीय युवा मोर्च्याचे पदाधिकारी गजानन पाटील, गिरीधर पाटील, महेंद्र पाटील, प्रेमनाथ पाटील, सतीश पाटील यासंह अनेक गावकरी सहभागी झाले होते