मुंबई : पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून पत्रकार सामाजिक संघटनांसह सर्वच स्थरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक सभागृहात निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिला होता. मात्र, आयोजक सभा घेण्यावर ठाम राहिले. सभागृहाच्या दिशेने जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, अॅड. असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या कारवर वाटेतच हल्ला झाला. प्रवास करत असलेली कार चारही बाजूने फोडण्यात आली. त्याशिवाय शाई फेक करण्यात आली.

मुंबई पत्रकर संघाच्यावतीने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे हल्लेखोरांवर कठेार कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निर्भिडपणे सत्य मांडणा-या पत्रकारांवर हल्ले होत असतात पण अशा हल्ल्यांमुळे पत्रकारांचा आवाज दाबता येणार नाही हे हल्लेखोरांनी लक्षात ठेवावे. पत्रकारांची लेखणी अधिक बाणेदारपणाने अन्यायविरूध्द आणि झुंडशाहीविरूध्द आवाज उठवित राहिल असा विश्वास संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यवाह संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात झालेल्या या हल्ल्याचा निषेध कलाकारांनीदेखील केला आहे. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे याने देखील हल्ल्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्याने म्हटले की, जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो. पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली असल्याचे हेमंत ढोमे याने निखिल वागळे यांनी उद्देशून म्हटले.

मराठी अभिनेत्री वीणा जामकर हिने देखील फेसबुकवर हल्ल्याचा निषेध केला. निखिल वागळे, चौधरी सर, आणि असीम सरोदे ह्यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!! असल्याची पोस्ट वीणा जामकर हिने केली.

अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. हमीं पे हमला करके, हमीं को हमलावर बताना…सब याद रखा जाएगा, सबकुछ याद रखा जाएगा ! या कवितेच्या काही ओळी माने यांनी पोस्ट केल्या आहेत.

पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. पहिला गुन्हा पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचा समावेश आहे. तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरदेखील दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!